मृत्युचा जबडा. Marathi horror story part-1

मृत्युचा जबडा

by sanjay kamble

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायच आणी खुप मजा मस्ती करायची हा आपल्या सर्वांचाच आवडता छंद. माझाही.. असच एकदा गावी असताना रात्री जेवण आवरून अंगणात सर्व भावंड बसलो होते... सर्वांनीच आजीला गावाकडचे भुतांचे किस्से, घटना सांग म्हणुन तगादा लावलेला तशी माझ्या आजीने आम्हा भावंडांना ही सत्यघटना सांगीतली... जो किस्सा आठवुन आजही अंगावर शहारा येतो..
Ghost


        आजोबांच वय साधारणता 30 ते 32 वर्षे असेल. त्यावेळीची गावे खुप मागासलेली होती, वाहतुकीच कोणतेही साधन नसल्याने प्रवास पायीच व्हायचा मग तो प्रवास कितीही लांबचा असला तरीही.
        एक दिवस आजोबांच्या बहिणीला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी आली आणि बाळाला पाळण्यात घालण्याच्या कार्यक्रमच सर्वाना निमंत्रण आल.. सांगितलेल्या दिवशी माझे आजोबा, चौघे भाऊ, सर्वाच्या बायका मुले असे सर्वजण निघाले. वाट किर्र आणि दाट जंगलातुन होती. जंगली श्वापदांची भिती असल्याने पुरूष आणि स्त्रीया असे सर्वाकडे धारधार लांबलचक कोयते ठरलेलेच. उन्हळ्याचे दिवस असल्याने फणस, आंबे, करवंदे, जांभळे असा रानमेवा खात प्रवास सुरू होता, गावापासुन काही अंतर पुढे गेले तोवर समोरच्या पाय वाटेने गावचे गुरव येताना दिसले . आजोबा काही बोलायच्या आत गुरव म्हणाले
" काय गा लक्ष्या (आजोबांचे नाव लक्ष्मण) भणीला पॉर ( बहिणीला पोरग) झाल व्हय...? म्या बी इचारलय म्हणून सांग तीला, आण शिस्तीन जावा. दोन दिसा पासन वाटतया कायतरी इप्रीत ( विपरीत, वाईट) हूनर. बायका पोरास्नी संबाळुन न्हे. चलतो म्या."

'व्हय गा' म्हणून आजोबा पुन्हा वाटेला लागले. कार्यक्रम संध्याकाळी होता त्यामुळे सर्वजन निवांत एकमेकांशी बोलत तर मुले दंगामस्ती करत चालले होते. पण माझी आत्या 'विमल' जी त्यावेळी अवघी सहा ते सात वर्षाची होती. एरवी दंगामस्ती करणारी पण त्या दिवशी एकदम शांत होती.

       सर्व गावामधे पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. सगळेच कार्यक्रमात गुंग झाले होते तर लहान मुले आपापल्या खेळात दंग झाली होती. पुर्ण अंधार पडला होता, दिवे लावनीची वेळ झाली. कार्यक्रम संपला. पुरूष माणस जेवण करून बाहेर सोप्या मधे गप्पा मारत बसले होते. सुपारीची खांड आडकीत्यात फोडुन त्याच्ये तुकडे चघळताना इकडच्या तिकडच्या गप्पा रंगु लागल्या.. मधे ठेवलेल्या दिव्याची वात कोणीतरी मोठी केली तशा पांढ-या मातीच्या भिंतींवर त्यांच्या सावल्या आणखी गडद्द झाल्या. त्या भिंतीवर चुन्याच्या बोटांना ओढलेल्या रेघांच ते सुरेख नक्षीकाम आणखीनच उठावदार वाटत होत..
अचानक मजघरात बायकांचा गोंधळ सुरू झाला, आजोबानी काय झाल विचरल तशी माझी आजी म्हणाली... 'इमल कुट दिसना'.
'इमल' म्हणजे 'विमल ' माझी आत्या.

आजोबा म्हणाले
"बगा, इकडच कुटतरी कुनाच्या तरी घरात आसल ती पोर".

" समदीकड बगीतल, कुटबी न्हाय." बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आल.

आजोबा एकदम चिडले,
"रडाया काय झाल. कोन मेल व्हय. म्या बघुन यतो."
एवढ बोलून ताडकन उठले आणि हातात काठी घेऊन बाहेर पडले, पाठोपठ त्यांचे भाऊ आणि दाजी ही निघाले. पुर्ण गावात शोधल, आजुबाजूचा परीसर पिंजुन काढला, घराघरात विचारल पण काहीच पत्ता लागत नव्हता... सगळे रिकाम्या हाती परतले तसे आजीला आणखीनच रडू कोसळले. रात्र पुढ सरकत होती तशी आता आजोबांना देखील काळजी वाटू लागली. बायकांच मुसमूसन सुरु झाल, लहान मुल आपापल्या आईच्या पदराखाली शिरली, कळती मुल भिंतीकडेला उभी थोरामोठ्यांच्या तोंडाकड आशेने पहात होती.
एका हाताने पदर सावरत आजी बाहेरच्या सोप्यात आली आणि भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली.
"कायतरी इपरीत झाल नसल नव्ह...देवळात जाऊन देवी म्होर कौल लाऊन तरी इचारा."

एवढ बोलुन पुन्हा आजी धाय मोकलुन रडू लागली ... आजीच बोलण संपत न संपत तशी सर्व पुरूषमंडळी गावच्या गुरवाकडे निघाली. तरातरा चालताना आजोबांच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले.
'एखाद्या जंगली जनावरान तर ओढत नेल नसल माज्या पोरीला, न्हाय न्हाय, आसल ती यवस्तीत.'

सर्वजण गुरवांच्या घरी पोहचले... हाक दिल्यानंतर गुरवांचा मुलगा बाहेर आला... मळका पांढरा शर्ट, आणी ठिगळ लावलेली खाकी चड्डी वर खेचतच विचारू लागला..

" काय ओ..?"

" तुजा बा कुठ हाय र..?" सोबत आलेल्यांपैकी एकान विचारल

'आबा पारावर आसल.' एवढ बोलून त्या पोरान जोरात हाक दीली,
"ये आबा.... कोनतर आलय बग..".

एवढ बोलून पुन्हा आत पळाला. पार घरापासुन काही पावलांवरच होता . 'पार' म्हणजे आंब्याच्या झाडा भोवती बांधलेला कट्टा. सर्वानी मोर्चा पाराकडे वळवला... समोरच्या एका वयस्कर व्यक्तिने हातात चूना तंबाखू आंगठ्यान मळत विचारले.
"कोन गा.?".

त्यावर आजोबांचे दाजी बोलू लागले.
"आगा मी शिरपा"..

"शिरप्या तू..? यवड्या रातचा..?"

"म्हेवण्याची पोर कुट गावना. लय हुडकली. पन काय बी सुगावा लागना तीचा. घरात बायका हनून, बडवून घ्याल्याता. तवा कौल बगून काय झालय ते तुमीच सांगा.."

सगळेच गंभीर झाले. दिर्घ श्वास घेत गुरव खाली उतरले , मळलेली तंबाखु जमिनीवर टाकुन बटवा पुन्हा बंडीच्या खिशात सारला
आणि देवळाच्या दिशेने चालु लागले . तसे सगळे लोक त्यांच्या पाठोपाठ निघाले. त्याकाळी गाव अविकसित . घड्याळं गोरगरीबांच्या आवाक्या बाहेर , वेळ अंदाजेच मोजली जायची. नऊ ते दहा वाजले असावेत...सर्वजण देवळात पोहोचले, देवीला नमस्कार करून सर्व देवळाच्या पाय-यावर, गाभा-यात जिथ जागा दिसेल तीथ बसले. गुरवांना कौल लावण्यास सुरवात केली.... सर्वांच्या नजरा गुरवांवर स्थिरावलेल्या.. गुरव काहीतरी मंत्र पुटपूटत होते. काही वेळानंतर गुरवांचा चेहरा गंभीर झाला, ते अजोबांकडे पाहून म्हणाले,

" पाव्हण, काळजावर दगड ठेऊन ऐका आणि धीर सोडू नगा".

आजोबांच्या डोळ्यात पाणी तराळले,
"काय झाल माझ्या पोरीला....?"

त्यावर गुरव म्हणाले,
" धीर धर. पोर जीत्ती हाय. पण...?"

"पन काय....?"

"पन... कोंबड आरवायच्या आत ती सपल."

आजोबानी जड अंत:करणाने प्रश्न विचारला, "म्हजे . काय झालय ? जनावरान काय केलय काय....?"

गुरव म्हणाले " न्हाय. जनावरान न्हाय, एका पिशाच्चान न्हेलय तिला. ती आजुन जीत्ती हाय पण रात भरात आल्यावर ते तुझ्या पोरीला सपीवनार."

"कुट हाय ती आता..?" पुन्हा आजोबांनी प्रश्न केला.

त्यावर गुरव म्हणाले, " हीतन पाच कोस लांब . 'भुताच्या जाळीत.' तुझ धाडस तुला तारल, तुझ भ्या तुला मारल."
   ....to be continued
Story by sanjay kamble

0 comments: